स्किझोफ्रेनिया हा दुर्मिळ व गंभीर मानसिक आजार, जगभरात जवळजवळ २४ दशलक्ष लोकांना बाधित करत आहे. ह्या आजाराबद्दल अनेकांना फारशी माहिती नाही त्यामुळे निदानात दिरंगाई होते. स्किझोफ्रेनियाबद्दल जागरूकता निर्माण करावी यासाठी दर वर्षी २४ मे ला जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस आयोजित केला जातो. त्यानिमित्ताने...
नीता (नाव बदलेले) मागील काही दिवस खूप अस्वस्थ होती. शेजारच्या घरातील लोक तिच्याबद्दल काहीतरी खलबते करीत होते. तिला संशय होता कि हे लोक तिच्या कुटुंबाची ईर्षा बाळगतात. ती माडीवर कपडे वाळत घालायला गेल्यावर तिला जाणवायचे कि शेजारील महिला तिच्याकडे पाहून आपसात काहीतरी कुजबुजतात. तिने ही गोष्ट तिच्या पतीला सांगितली मात्र त्यांना असे काही कधी जाणवले नव्हते. आपणाला जाणवत असणारा धोका घरात इतर कोणालाच जाणवत नाही हे पाहून ती अजूनच अस्वस्थ झाली. ती बाहेर जायचे टाळू लागली व आपल्या मुलांना ही बाहेर पडण्यास मना करू लागली. तिचा चिडचिडेपणा वाढला होता, झोप कमी झाली होती आणि पतीशी वारंवार भांडणे होऊ लागली होती. एक दिवस तर कहरच झाला. नीता शेजारील घरात जाऊन तेथील लोकांशी जोरजोरात भांडू लागली व तिथून बाहेर पडताना खिडक्यांची काचे फोडू लागली. तिचे हे वर्तन बघून पतीने तिला फॅमिली डॉक्टरकडे नेले जिथून तिला मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्यास सांगलीतले गेले.
नीता प्रमाणेच अनेक लोक अश्या अस्वस्थ करणाऱ्या मानसिक अवस्थेतून जातात ज्याबद्दल आकलन करणे सामान्य माणसाला कठीण होते. वास्तव्या पासून दूर असणाऱ्या अशा अनुभूती होणे म्हणजे स्किझोफ्रेनिया.
स्किझोफ्रेनिया आजाराची पार्श्वभूमी
अनेक शतकांपूर्वी जेव्हा मनोविकाराबद्दल फारसे शास्त्रीय विश्लेषण झालेले नव्हते तेव्हा मानसिक आजारांना देवाचा कोप, भूत बाधा, पूर्व आयुष्यातील कुकर्म असे अनेक तर्क लावले जात असत. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अश्या लक्षणांचे शास्त्रीय विश्लेषण होऊ लागले. 'वेड लागणे' या असामाजिक समजल्या जाणाऱ्या घटनेला 'मेंदूचा आजार' ह्या दृष्टिकोनातून बघितले जाऊ लागले. डॉ एमिल क्रेपलीन यांनी एकोणिसाव्या शतकात सर्वप्रथम ह्या आजाराचे वर्णन केले. पुढे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, स्विस मानसोपचार तज्ज्ञ डॉ युगेन ब्लॉइलर यांनी ' स्किझोफ्रेनिया' हा शब्दाची निर्मिती केली ज्याचा ग्रीक मूळ शब्द होता "स्किझ" म्हणजे दुभंगलेले आणि "फ्रेन" म्हणजे मन.
स्किझोफ्रेनियाची लक्षणे
ह्या आजारमध्ये माणसाला संशय होऊ लागतो कि कोणी त्याच्याबद्दल बोलत आहे किंवा वाईट चिंतत आहे, कानामध्ये आवाज येऊ लागतात जे वास्तवात नाहीत व डोळ्यासमोर चित्रे दिसू लागतात जे इतर कोणाला दिसत नाहीत. वर्तनामध्ये फरक ही जाणवू लागतो, जसे खूप चिडचिड करणे, वस्तूंची आदळआपट करणे किंवा मारायला धावून जाणे. कधी कधी माणसाचे बोलणे कमी होते व तो दुसऱ्याच जगात हरवला आहे असे जाणवू लागते. स्वतःच्या जीवनावश्यक कृतींकडे दुर्लक्ष होऊ लागते जसे अंघोळ ना करणे, स्वच्छ कपडे ना घालणे, पुरेशी झोप ना लागणे, जेवण ना जेवणे ई.. मादक पदार्थांचे सेवन जसे दारू, तंबाखू यांमध्ये वाढ ही होऊ शकते.
आजाराच्या पुढील टप्प्यात असंबद्ध बोलणे, भान हरवल्यासारखे वागणे, समाजाशी संपर्क तुटल्यासारखे वागणे ई. दिसू शकते. बऱ्याच वेळा रस्त्यावर निष्काळजी फिरणारे लोक किंवा कचरा खाणारे अस्वच्छ लोक ह्यांना स्किझोफ्रेनिया आजार असण्याची शक्यता असते.
स्किझफ्रेनियाचे उपचार
हा आजार उदासीनता (डिप्रेशन) किंवा चिंता (अँक्सिएटी) यासारखा नसून त्याला अनेक वेळा ‘गंभीर मानसिक आजार’ असे ही संबोधले जाते. अश्या आजाराला औषधोपचार, गोळ्या व इंजेकशन ची गरज पडते. याचे उपचार हे प्रदीर्घ वेळ चालू राहतात. लक्षणांमध्ये सुधारणा दिसू लागल्यानंतर माणसाचे दैनंदिन काम पूर्वपदावर येऊ शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या बंद करणे किंवा इतर उपचार पद्धती वापरणे अपायकारक ठरू शकते.
स्किझोफ्रेनिया बद्दल गैरसमज
सामान्य माणसात ह्या आजाराबद्दल माहिती अपुरी आहे तसेच हा आजार समजण्यासाठी गुंतगुंतीचा आहे. त्यामुळे ह्याबद्दल अनेक गैरसमज ही आहेत. अनेक लोक ह्या आजाराला 'वेड लागणे' असे समजतात ज्यामुळे अश्या रुग्णांशी भेदभाव करणे, त्यांना वाईट वागणूक देणे हा प्रकार होतो. अनेक वेळा असे ही समजले जाते कि हे रुग्ण हिंसा करतात आणि त्यांच्यापासून धोका निर्माण होतो. मात्र शोध-अभयासात असे दिसून आले आहे कि अश्या रुग्णांमध्ये आणि सामान्य माणसांमध्ये हिंसेच्या प्रमाणात काहीच फरक नाही.
अश्या रुग्णांना बऱ्याच वेळा असे सल्ले मिळतात कि मनावर ताबा ठेवावा, योग व व्यायाम करावा, इतर कामात गुंतवावे ज्यामुळे हे विक्षिप्त विचार दूर होतील किंवा फक्त कॉउंसेलिंग करून घ्यावे. ह्या सर्व सल्ल्यांमध्ये काहीही तथ्य नसून ते निव्वळ गैरसमज आहेत. बराच वेळा अश्या आजारासाठी बाबा-बुवा, तांत्रिक-मांत्रिक केले जातात. मात्र स्किझोफ्रेनियासाठी केवळ आणि केवळ औषधोपचाराची गरज असते. गोळ्यांची सवय लागेल असे ही लोक म्हणतात. हे खरे नसून प्रदीर्घ उपचाराची गरज असते हे समजणे गरजेचे आहे. स्किझोफ्रेनिया आजार हा संसर्गजन्य नाही. अश्या रुग्णांच्या सानिध्यात राहिल्याने इतरांचे मानसिक स्वास्थ्य बिघडत नाही.
स्किझोफ्रेनिया रुग्णांनी घ्यावयाची काळजी
स्किझोफ्रेनिया रुग्णांनी नियमितपणे डॉक्टरांचा सल्ला घेणे व उपचार नियमित चालू ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कोणताही दुष्परिणाम जाणवल्यास त्वरित डॉक्टरांना भेटणे ही गरजेचे आहे. पुरेशी झोप घेणे, नियमित व्यायाम करणे, अर्थपूर्ण सामाजिक संबंध बनवणे, मदतीला मित्र- नातेवाईक असणे ह्या सर्व गोष्टींनी तणाव दूर ठेवता येतो आणि आजारासहित सामान्य जीवन जगता येते.
शंभरात एक ह्या प्रमाणात सापडणारा स्किझोफ्रेनिया हा दुर्मिळ पण गंभीर मानसिक आजार आहे आणि ह्या रुग्णांना तुमच्या दयेची गरज नसून आपुलकी व आधाराची गरज आहे.